मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेसाठी महत्त्वपूर्ण मानली जात असलेली काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यातील बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक उद्या (रविवारी) होणार होती, तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमावर दोघांमध्ये चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही बैठक पुढे ढकलण्यात आली असून ती आता सोमवारी होणार आहे.
हेही वाचा -पक्षांतर केलेले नेते परतीच्या वाटेवर? 'या' भाजप आमदाराच्या पवार भेटीने चर्चांना उधाण
राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रयत्न सुरू आहे. शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या विचारधारा वेगळ्या असल्याने त्यासाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. तो मसुदा वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, आता वरिष्ठांनी हिरवा कंदील दिल्यानंतर सरकार स्थापन करू, असे तीनही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले आहे.
राज्यात भाजप, शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन करण्यात अयशस्वी ठरल्यानंतर राज्यपालांनी शिफारस केल्यानंतर १२ नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर भाजप बाजूला पडला असून सत्तास्थापनेसाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर ते सत्तास्थापन करेल, असे चित्र आहे.