मुंबई- दोन दिवसापूर्वी घरी आलेल्या श्रीगणरायाचे विसर्जन मुंबईच्या चौपाटीवर झाले. याला एक दिवस न होतो तर ते सर्व निर्माल्य आणि मुर्ती समुद्राने आपल्या पोटातून बाहेर फेकल्या आहेत. चौपाट्यांवर दिसणारे चित्र इतके भीषण आहे की आपण किती मोठी चुक करतोय हेच कळेनासे झालंय. यावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने एक फोटो शेअर करीत आपली खंत व्यक्त केली आहे.
सोनालीने शेअर केलेल्या फोटोत बाप्पाच्या तुटलेल्या मुर्ती, प्लास्टिकच्या बाटल्या, हारतुरे, आणि प्रचंड कचरा दिसतो. गेली सात दिवस ज्या बाप्पाची आपण पूजा केली त्याची ही अवस्था होत असेल तर समाजाने विचार करण्याची गरज आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनाली लिहिते, ''काल झालेल्या विसर्जनानंतर आपण केलेल्या नुकसानीचे जर हे चित्र नसेल तर मला माहीत नाही की याहून वेगळं काय असेल, हे होता कामा नये. ही परिस्थिती आपणच बदलली पाहिजे,”
सगळीकडेच गणेश विसर्जन वाहत्या पाण्यात करण्याची चालरीत दिसून येते. याला काही धार्मिक आधार असल्याचेही समर्थक सांगतात. मात्र धर्मशास्त्रात सांगितलेल्या सोयीच्या गोष्टीच ते करीत असतात. खरंतर नदीकाठच्या मातीचा गणेश बनवून तो वाहत्या नदीत सोडण्याची पध्दत आहे. मात्र प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायची, त्याला आरास प्लास्टीकच्या फुलांनी करायची आणि त्याचे विसर्जन मात्र वाहत्या पाण्यात करायची प्रथा फोफावलेली आहे.
दोन दिवसापूर्वी गौरी गणपतींचे विसर्जन झाले. ज्यांनी वाहत्या नदीत केले त्यांचे निर्माल्य आणि मूर्ती वाहून गेल्या. मात्र नदी प्रदूषित करुन हा व्यवहार होता याचे बिल्कुल भान असे करणाऱ्यांना नव्हते. अलिकडे जो सांगली कोल्हापूरला महापूर आला त्यातून जे वाहून आले त्याची दृष्ये पाहिली तर आपण काय काय पाण्यात टाकतो, याची शरम वाटू लागेल. या पार्श्वभूमीवर सोनाली बेंद्रेने केलेले ट्विट विचार करायला भाग पाडणारे आहे.