मुंबई - राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये कोरोनाचा कहर सुरू असतानाच अनेक खासगी शाळांच्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांकडून शिक्षकांना शाळांमध्ये रोज हजेरी लावण्याचे आदेश दिले जात आहेत. इतकेच नाही तर शाळांमध्ये शिकवण्याचे काम नसतानाही त्यांना बसवून ठेवले जात असून याची गंभीर दखल शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे.
मुंबई आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरातील शाळांमध्ये बोलावले जात असल्यावरून शाळांना ताकीद देण्याचे आदेश मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल नुकतीच शिक्षण आयुक्त कार्यालयानेही घेतली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना आणि शिक्षक परिषदेने केलेल्या तक्रारीची नोंद घेण्यात आली असल्याची माहिती या संघटनांच्या प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.