मुंबई- 21 जून रोजी भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. यामुळे, ग्रहणादरम्यान सूर्याचा 62 टक्के भाग मुंबईमध्ये झाकला जाणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी म्हणजे राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये काही भागात सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल. तर, देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.
मुंबईत ग्रहणाची सुरुवात 10 वाजून 49 सेकंदानी होईल. तर, 11 वाजून 37 मिनीट आणि 41 व्या सेकंदाला ग्रहणाची व्याप्ती जास्त दिसेल. 1 वाजून 27 मिनीट 50 व्या सेकंदाला ग्रहणाची अंतिम स्थिती असेल. मुंबईत तीन तास 27 मिनीट आणि 1 सेकंद असा ग्रहणाचा कालावधी असेल. सूर्याची व्याप्ती 62.10 टक्के असेल आणि परिमाण 0.69 असे असेल.
21 जूनला कंकणाकृती सूर्यग्रहण मध्य आफ्रिका गणराज्यातून उगवणाऱ्या सूर्यापासून सुरू होऊन पुढे कांगो, इथोपिया, येमन , सौदी अरब, ओमान, पाकीस्तान, भारत, चीन आणि तैवान इथे पाहायला मिळेल. सूर्यग्रहण दक्षिण प्रशांत महासागरात संध्याकाळी समाप्त होईल. देहरादून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाईल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94 % भाग, गुवाहाटीमध्ये 80 %, पाटणा येथे 78%, सिलचर येथे 75%, कोलकाता येथे 66%, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरूमध्ये 37% , चेन्नईमध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअर येथे 28% भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल. कंकणाकृती ग्रहण कॉंगो, सुदान, इथिओपिया, येमेन, सौदी अरब,ओमान, पाकिस्तानसह भारत आणि चीनच्या उत्तर भागांमधून दिसेल.