महाराष्ट्र

maharashtra

कृषी संजीवनी प्रकल्पात मृद व जलसंधारणची प्रक्रिया होणार ऑनलाईन

By

Published : Feb 26, 2021, 7:37 PM IST

'पोक्रा' प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे गावांची माहिती संकलित करण्यात आल्याने ती पुढील हंगामांच्या योग्य नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेला अनुसरून नियोजन करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या आहेत.

कृषीमंत्री दादाजी भुसे
कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनामध्ये होणाऱ्या मृद व जलसंधारण कामांची प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने 'पोक्रा' हे एक पोर्टल तयार करण्यात आले असून कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गुरुवारी उदघाटन करण्यात आले.

गाळ साचणार नाही याची काळजी
'पोक्रा' प्रकल्पाअंतर्गत ऑनलाईन प्रणालीद्वारे गावांची माहिती संकलित करण्यात आल्याने ती पुढील हंगामांच्या योग्य नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेला अनुसरून नियोजन करण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या आहेत. ज्या भागात ज्या पिकांचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेतले जाते तिथे संबंधित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे कृषिमंत्री म्हणाले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोक्रा) प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच शेततळे बांधताना त्यामध्ये गाळ साचणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला भुसे यांनी दिला.

आराखडा प्रक्रियेचा आढावा
'पोक्रा'च्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील सुमारे चार हजार गावांमध्ये लोकसहभागीय पद्धतीने सूक्ष्म नियोजन आराखडा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही प्रक्रिया गावांमध्ये प्रत्यक्ष राबविली जात आहे. उस्मानाबाद, अमरावती, वर्धा, यवतमाळ, जळगाव, बीड व बुलढाणा या सात जिल्ह्यांतील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, शेतकरी, कृषी अधिकारी, कृषीताई, तसेच भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. यावेळी पोक्राचे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव सुशील खोडवेकर, अवर सचिव श्रीकांत आडंगे व अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी कुटुंबासाठी आशेचा किरण
शेततळी बांधण्याच्या कामात खोदाई यंत्रे उपलब्ध करून भारतीय जैन संघटनेने केलेले सहकार्य मोलाचे आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील गावांतील ही कामे शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रेरक आहेत. यापूर्वीही संघटनेने गाळ काढण्याच्या कामात सहकार्य घेतल्याने अनेक ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेत वाढ झाली आहे. यामुळे अनेक होतकरू शेतकरी कुटुंबांसाठी हा आशेचा किरण ठरला असल्याचे कृषीमंत्री भुसे म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details