मुंबई:उत्तर प्रदेशातील गाजियाबादमध्ये राहणाऱ्या राजबाबूने गेल्या वर्षी 24 सप्टेंबर या सरकारी सुट्टीच्या दिवशी पासपोर्ट कार्यालयातील पासवर्ड हॅक करत तीन फाईल क्लियर केल्या. 26 सप्टेंबरला हा प्रकार पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांना निदर्शनास आला. अधिक चौकशी दरम्यान एका महिला अधिकाऱ्याच्या आयडीवरून तीन फाईल क्लियर झाल्याचे उघडकीस आले. ज्यांच्या फाईल पासवर्ड हॅक करून क्लियर करण्यात आल्या, त्या फाइल्स मुंबईतील महिलांच्या होत्या.
अन् तो पोपटासारखा बोलता झाला: याप्रकरणी सायबर पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाने तपास सुरू केला. त्याचप्रमाणे फाईल क्लियर केलेल्या तीन महिलांची देखील कसून चौकशी करण्यात आली. त्यापैकी एका महिलेला परदेशात नोकरीसाठी जायचे असल्याने तिने अर्ज केला होता. यात सुतापासून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न सायबर पोलिसांनी केला आणि त्यांना यश मिळाले. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने गाझियाबाद येथून राजाबाबूला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सायबर पोलिसांनी खाक्या दाखवताच राजाबाबू फडफडा बोलू लागला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. राजाबाबूने सायबर पोलिसांना सांगितले की, पत्नीला परदेशात जाण्याची इच्छा होती. तिला इम्प्रेस करण्यासाठी पासवर्ड हॅक करून पासपोर्ट क्लियर केल्याचे त्याने चौकशीत सांगितले.
गुन्हा कसा आला उघडकीस? : आरोपी राजाबाबूने एका महिला अधिकाऱ्याच्या आयडीवरून मुंबईतील तीन महिलांच्या पासपोर्ट फाईल क्लिअर केल्या. या प्रकरणी दिल्लीला मेल पाठवून चौकशी करण्यात आली. तेथून आयपी ऍड्रेसची माहिती मिळताच कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पासवर्ड आयडी हॅक करून ही घटना घडवून आणण्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तपास करण्यात आला. पासपोर्ट शाखा 2 येथे पोलीस निरीक्षक पांडुरंग सावंत यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विदेश मंत्रालयाने यासाठी पासपोर्ट पोर्टल तयार केले आणि त्याचा सर्वर व यंत्रणा दिल्लीत असल्याचे कळले. पासपोर्ट कार्यालयातील पोलीस अधिकाऱ्याला स्वतंत्र पासवर्ड आयडी देण्यात आला आहे.