मुंबई - एकीकडे दाटीवाटीच्या वस्तीत सोशल डिस्टन्स पळाले जात नसल्याचे समोर येत असतानाच, आता सरकारी यंत्रणेच्या बस मध्येही सोशल डिस्टन्सिंगची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनाला येत आहे. कसले सोशल डिस्टन्स आणि कसले काय, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
दोन माणसांमध्ये साधारण एक मीटरचे अंतर असावे, असे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमात नमूद करण्यात आलेले आहे. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या बसमध्ये खेटून प्रवासी बसत आहेत. पालिका कर्मचारी, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, बँक कर्मचारी आणि काही डॉक्टर्सही या अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या बसमधून दररोज प्रवास करत असतात. या कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी केवळ मुंबई आणि उपनगर नाही. तर ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, वसई, विरार येथूनही मुंबईसाठी विशेष फेऱ्या सुरू आहेत. मात्र, या फेऱ्या अपुऱ्या असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.