मुंबई- मागील साडे चार महिन्यांपासून मुंबई कोरोनाच्या संकटात आहे. आता मात्र मुंबईवरील हे संकट हळूहळू कमी होत आहे. 3 ऑगस्टला येथील रूग्ण वाढीचा दर 0.89 टक्क्यांवर आला आहे. तर त्याचवेळी येथील गंभीर रुग्णांची संख्याही कमी होत चालली आहे. आजच्या घडीला 1 हजार 65 गंभीर रूग्ण असून सक्रिय (ऍक्टिव्ह) रुग्णांच्या केवळ 5 टक्के हे रूग्ण आहेत. त्याचवेळी रुग्ण दुप्पटीचा दर 78 दिवसांवर गेला आहे. तर मोठ्या संख्येने खाटा रिक्त असल्याने आता छोटी क्वारंटाईन-कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. ही मोठी दिलासादायक बाब असली तरी कोरोनाचे संकट लस येईपर्यंत कायम राहणार असल्याने नियम पाळणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
मार्चपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सुरू असलेला कोरोनाचा कहर आता मात्र कमी होताना दिसत आहे. गेल्या कित्येक दिवसांत मुंबईतील रुग्णांचा आकडा 900 ते 1 हजार 300 च्या दरम्यानच दिसत आहे. मुंबईतील एकूण रुग्णांचा आकडा 1 लाख 17 हजार 406 इतका आहे. तर यातील 90 हजार 89 रूग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. त्यामुळे आता रूग्ण बरे होण्याचा दर थेट 76 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर ही 78 दिवसांवर गेला आहे. एकूणच रुग्णसंख्या कमी होत असून त्यातही लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने असे रुग्ण होम क्वारंटाईन होत आहेत. परिणामी सध्या मुंबईत तब्बल 9 हजार 698 खाटा रिक्त आहेत.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे आता मुंबईतील गंभीर रुग्ण खूपच कमी होत आहेत. मुंबईत एकूण ऍक्टिव्ह रुग्णांच्या 5 टक्के म्हणजेच 1 हजार 65 रूग्ण गंभीर आहेत. तर ऍक्टिव्ह रुग्णांच्या 69 टक्के म्हणजेच 14 हजार 737 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. लक्षणे आहेत पण तब्येत स्थिर आहेत असे ऍक्टिव्ह रुग्णांच्या 26 टक्के रूग्ण असून हा आकडा 5 हजार 610 इतका आहे. दरम्यान, क्वारंटाईन करावे लागणाऱ्याची संख्या तसेच लक्षणे असणाऱ्याची संख्या कमी होत असल्याने आता क्वारंटाईन सेंटर आणि छोटी कोविड सेंटर बंद करण्यात येत आहेत. रुग्ण कमी झाल्याने आता क्वारंटाईन आणि छोट्या कोविड सेंटरमधील नागरिकांची संख्या ही कमी झाली आहे. त्यामुळे आता हळूहळू ही छोटी सेंटर बंद करण्यात येत आहेत. काही सेंटर बंद ही झाली आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
मुंबईकरांना दिलासा..! रुग्ण वाढीचा दर 0.89 टक्क्यांवर, छोटी क्वारंटाईन अन् कोविड सेंटर केली बंद
मुंबईतील कोरोनग्रस्त रुग्ण वाढीचा दर 0.89 टक्क्यांवर आला आहे. तसेच गंभीर रुग्णांची संख्याही कमी होत आहे. यामुळे छोटे क्वारंटाईन व कोविड सेंटर तात्पुरती बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
रूग्ण कमी झाल्याने समाज मंदिर, शाळा, हॉल, खासगी-सरकारी इमारतीमधील छोटी सेंटर बंद करण्यात येत आहेत. पण, ही सेंटर कायमस्वरुपी नव्हे तर तात्पुरती बंद करत आहोत. जणे करून आता गरज नसल्याने वीज बिल, देखरेख खर्च वाचेल आणि तेथील मनुष्यबळ गरजेच्या ठिकाणी वापरता येईल, असेही काकाणी यांनी सांगितले आहे. दरम्यान, रूग्ण वाढीचा दर असो गंभीर रूग्ण कमी होण्याचा दर असो पण लस येईपर्यंत कोरोनाचे संकट कायम सोबत असणार आहे. तेव्हा मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे हे मुंबईकरांनी अजिबात विसरता कामा नये, असे आवाहन डॉक्टर यानिमित्ताने करत आहेत.