मुंबई - उन्हाळी सुट्टी सुरू झाली आहे. मात्र, लहान मुले ही मैदानात रमण्यापेक्षा मोबाईल गेम, व्हिडिओ गेम याकडे त्यांचा कल जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांना मैदानी खेळात तसेच भारतीय सेनेमध्ये जाण्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी प्रभादेवी येथील नॉलेज अॅक्टिविटी सेंटरच्या माध्यमातून मागील ७ वर्षांपासून छोटा कमांडो हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
लहान मुलांसाठी 'छोटा कमांडो' या उपक्रमाचे आयोजन काही वर्षांपूर्वी मोबाईल नव्हते. यामुळे लहान मुले उन्हाळी सुट्टीत मैदानात दिसायचे. आता मात्र याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलेही आळशी झाली आहेत. घरी बसून गेम खेळून सुट्टीचा आनंद लुटण्यात त्यांना चांगले वाटते. लहान मुले ही फिट राहिली पाहिजेत. त्यांना शिस्त लागली पाहिजे या हेतूने प्रभादेवी येथील एका संस्थेने छोटा कमांडो हा उपक्रम राबवला. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी ४० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
ड्रिल, फिजिकल फिटनेस, स्वरक्षण, धनुर्विद्या, रोड सेफ्टी, नकाशा वाचन आपत्कालीन परिस्थितीपासून कसे वाचायचे, फायर फायटिंग, साप कसा ओळखायचा अशी विविध गोष्टी या उपक्रमात शिकवल्या जातात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रतिकार शक्ती वाढते. तसेच स्वरक्षणाचा फायदा हा लहानग्यांना वाईट प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी होऊ शकतो.
पुढची पिढी घडवायची तर काय केले पाहिजे, यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. त्याबरोबर आग लागली तर काय करायचे. भूकंप किंवा पूर आला तर आपला जीव आणि दुसऱ्याचा जीव कसा वाचवायचा, याची माहिती आणि प्रात्यक्षिक आम्ही या उपक्रमात देतो. रायफल शूटिंगचेही धडे आम्ही देतो. पुढची पिढी घडवण्यासाठी, आमचा हा प्रयत्न असल्याचे माजी सैनिक महेश दरवडे यांनी सांगितले.
नॉलेज बुक लायब्ररी आणि विंग मिलिटरी अॅक्टिविटी सेंटर हे जवळपास ७ वर्षांपासून या मैदानी खेळांमध्ये आणि इनडोअर गेममध्ये काम करत आहे. तर मैदानी खेळ हे मुलांना कळावे. मुलांना मोबाईल आणि टीव्ही यापासून सुटका मिळावी, माती काय असते, एडवेंचर काय आहे हे सर्वांना ओळख करुन देण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे, असे डॉक्टर जयश्री साठे छेडा यांनी सांगितले.