मुंबई - महाराष्ट्र विकास आघाडी राज्यात सत्तेवर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. पाहुयात या सहा मंत्र्यांच्या कारकिर्दीचा आढावा
एकनाथ शिंदे
जन्म ९ फेब्रुवारी १९६४
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शपथ घेणारे एकनाथ शिंदे पहिले मंत्री होते. रिक्षा चालक ते मंत्रीपदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्याचे मूळ रहिवासी असणारे एकनाथ शिंदे ठाण्यात आले. ११ वी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर शिंदेंना शिक्षण सोडावे लागले. त्यांनंतर त्यांनी छोटेमोठे कामे करायला सुरुवात केली. याच काळात त्यांनी रिक्षा चालक म्हणून काम केले.
रिक्षा चालवता चालवता त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्यांनी बी.ए. च्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण केले. १९८० च्या सालात ते शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. इथूनच सुरू झाला त्यांचा राजकीय प्रवास. दिघेंच्या मृत्यूनंतर शिंदे ठाण्याच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा झाले. त्यानंतरचा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला. ते चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत.
मागील सरकारमध्ये त्यानी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केले. आता उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
सुभाष देसाई
जन्म १२ जुलै १९४२
ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ म्हणून सुभाष देसाईंची ओळख आहे. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्री म्हणून काम पाहिले आहे. देसाई आतापर्यंत तीन वेळा विधान परिषदेवर निवडून आले आहेत. १९९० नंतर ते सभागृहात नव्हते. त्यानंतर ते २००४ आणि २०१४ ला ते विधान परिषदेवर निवडून गेले. मुंबईच्या पालकमंत्रीपदाचाही त्यांना अनुभव आहे.
जयंत पाटील
जन्म १९६२
काँग्रेसचे नेते राजाराम पाटील यांचे जयंत पाटील वारसदार आहेत. १९८४ ला राजाराम पाटलांचं निधन झाले आणि जयंत पाटलांना विदेशातून भारतात परत यावे लागले. पाटील आतापर्यंत ६ वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. ग्रामीण विकास, गृह आणि अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.
छगन भुजबळ
जन्म १५ ऑक्टोबर १९४७
छगन भुजबळांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासून झाली. १९८५ ला ते मुंबईचे महापौर झाले. मुंबईच्या माझगाव मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून त्यांनी सभागृह गाजवले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री, उप मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भुजबळांनी काही चित्रपटांची निर्मीती देखील केली आहे. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना केली तेव्हा ते राष्ट्रवादीत दाखल झाले. ज्या शिवसेनेसोबत त्यांनी सामना केला त्याच उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आता त्यांनी शपथ घेतली आहे.
बाळासाहेब थोरात
जन्म ७ मार्च १९५३
बाळासाहेब थोरातांना राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील भाऊसाहेब थोरात हे आमदार होते. थोरात ८ वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांना महसूल खात्यासारख्या मंत्रीपदाचा अनुभव आहे. नगर जिल्ह्यात त्यांनी दूध महासंघाची स्थापना केली. सहकार क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.
नितीन राऊत
अनुसुचीत जातीतील नितीन राऊत काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. काँग्रेसच्या अनुसुचीत जाती सेलचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते आतापर्यंत ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी रोहयो मंत्री म्हणून काम केले. विदर्भातील नेता म्हणून काँग्रेसने त्यांनी संधी दिल्याचे बोलले जात आहे.