मुंबई - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 22 मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्ट्रात कलम 144 लागू करून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे आतापर्यंत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या हजारो व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून कारवाई यापुढेही सुरूच आहे. मात्र, संचारबंदीचा नियम मोडणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होत असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मात्र इतर गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा...गुजरातमध्ये विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तीची आत्महत्या; कोरोना अहवाल आले 'निगेटिव्ह'..
दिनांक 23 मार्च ते 29 मार्चपर्यंत मुंबई शहरामध्ये केवळ 1 खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच खुनाचा प्रयत्न करण्याच्या संदर्भातील 3 गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. दरोड्याच्या प्रकरणी मुंबईत 3 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले असून, साखळी चोरीच्या संदर्भात मुंबई शहरात 2 गुन्हे घडले आहेत. रात्रीच्या वेळेस घरफोडी करण्याच्या संदर्भात 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले असून वाहनचोरी होण्याची 20 प्रकरण मुंबई पोलिसांच्या विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. बॉडी ऑफेन्स ( जबर जखमी ) चे 38 गुन्हे या काळात दाखल करण्यात आले असून दंगलीचे 4 तर बलात्काराचे 3 व इतर प्रकरणात 456 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 23 मार्च 29 मार्च या काळात मुंबई शहरात एकूण 550 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.