मुंबई- नटसम्राट श्रीराम लागू यांचे 92 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक मान्यवर श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांना सर्वांत नैसर्गिक अभिनेत्यांपैकी एक म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी रंगभूमीला आणि अभिनय क्षेत्राला उत्तुंग उंचीवर नेणारे कलाकार आज आपल्यातून निघून गेले. अशा दिग्गज कलाकाराला आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो, असे म्हणत सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई श्रद्धांजली अर्पण केली.
नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने एका नटसम्राटाची एक्झिट झाली. आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या बळावर दीर्घकाळ मराठी रंगभूमी तसेच मराठी व हिंदी चित्रपट सृष्टी गाजविणारे डॉ. श्रीराम लागू यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहेत. वि. वा. शिरवाडकर यांच्या नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा डॉ. लागूंनी घराघरापर्यंत मनामनापर्यंत पोचवली. लमाण हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येक कलावंतासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य तसेच चित्रपट सृष्टीची तसेच हिंदी चित्रपट सृष्टीची अपरिमित हानी झाली, अशा शब्दात दुःख व्यक्त करत माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना "अभिनय जगतातील 'सिंहासन'" असल्याचे म्हणत श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे त्यांना "अनेक कलावंतांसाठी दीपस्तंभ" म्हणत त्यांना श्रद्धांजली दिली.