मुंबई Shreyas Talpade Hospitalized : अभिनेता श्रेयस तळपदेला उच्च रक्तदाबामुळं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. श्रेयसला मुंबईतील अंधेरीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. श्रेयस हा 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यानंतर तो घरी पोहोचला. तेव्हा छातीत दुखू लागल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं.
- श्रेयस तळपदेला हृदयविकारामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची सोशल मीडियात चर्चा आहे. श्रेयस तळपदेला हृदयविकारामुळे नव्हे तर उच्च रक्तदाबामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचं श्रेयसच्या सेक्रेटरीनं सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं : श्रेयस हा गुरुवारी वेलकम टू जंगल या सिनेमाच्या शुटींगला गेला होता. त्याच्या वेळेनुसार तो सेटवरही पोहचला होता. तो सेटवर सगळ्यांशी व्यवस्थित आणि हसून-खेळून बोलत होता. त्यानं दिवसभर शुटींगही केलं. तो पूर्णपणे ठीक होता. त्यानं काही अॅक्शन शॉट्सदेखील शूट केले. त्यानंतर तो घरी परतला. त्यानं त्याची पत्नी दिप्तीला सांगितलं की, थोडं अस्वस्थ वाटतंय. यानंतर तिनं श्रेयसला तातडीनं रुग्णालयात नेलं. उपचारांनंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे. त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय.