मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई विविध प्रकल्प आणि कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. मुंबईच्या विकासासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आणि महत्त्वाकांक्षी आहेत असे सांगतानाच आपले सरकार हे विकासाचे सरकार आहे, येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी साद घालण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आला.
कशी घातली पंतप्रधानांनी मुंबईकरांना साद?मुंबईच्या विकासासाठी मुंबईकरांची साथ अत्यंत महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षात मुंबईचा विकास झाला नाही. केवळ कामे रखडवण्याची भूमिका घेतली गेली असा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत जर सत्ता असेल तर अधिक कामे होतील, असा दावा करीत मुंबईकरांना अप्रत्यक्षरीत्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदे गटाच्या सोबत उभे राहण्याचे आवाहन केले. मुंबईत अडतीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे लोकार्पण होत आहे मुंबईकरांच्या विकासाचे स्वप्न हळूहळू पूर्ण होत आहे आणि हे केवळ डबल इंजिन सरकार म्हणजेच शिंदे फडणवीस यांच्यामुळे होत आहे आधीच्या सरकारने काहीही काम केले नाही त्याचा फटका मुंबईकरांना बसतो आहे असा अप्रत्यक्ष दावाही त्यांनी केला.
मुंबईकरांना पैसा कमी पडू देणार नाही - मुंबईच्या विकासकामांसाठी डबल इंजिन सरकार नक्कीच मेहनत घेईल त्यासाठी मुंबईत भाजपा शिंदे गटाची सत्ता असायला हवी असे म्हणत महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंगच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने फुंकले आहे. भाजप आणि एनडीए कधीही विकास कामांना ब्रेक लावत नाही मात्र गेल्या काही काळात विकास कामांना ब्रेक लावला गेला मुंबईतील छोटे व्यावसायिक फेरीवाले यांच्यासाठी असलेला स्वनिधी तत्कालीन सरकारने रोखला होता आणि म्हणूनच सव्वा लाख लाभार्थी त्यापासून वंचित राहिले असा आरोपही पंतप्रधानांनी यावेळी केला.