शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू मुंबई Shiwadi Sea Link : दिवसेंदिवस वाढत जाणारं प्रदूषण सध्या मुंबई महानगरपालिकेसमोरची मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागील वर्षी डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेची सुरुवात केली. डीप क्लीन ड्राईव्ह अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहीम आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूची देखील पाहणी केली.
12 जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, "हा सागरी सेतू आता लोकांच्या वापरासाठी सज्ज आहे. याचं लोकार्पण 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. हा सागरी सेतू गेम चेंजर ठरणार आहे. यामुळं मुंबई आणि रायगडमधील अंतर कमी होणार असून, सध्या ज्या रस्त्यावरुन आपण प्रवास करतोय, त्या रस्त्यावरुन मुंबईतून रायगडला जाण्यासाठी एक ते दीड तास लागतो. मात्र, या सागरी सेतुमुळं आता तेच अंतर आपल्याला फक्त वीस मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळं यातून वेळेसोबतच इंधनाची देखील बचत होईल."
त्यांनी अडीच वर्षात केलेली घाण आम्ही साफ करत आहोत : या सागरी सेतूवर राज्य सरकारनं अडीचशे रुपये टोल आकारण्याचा निर्णय घेतलाय. यावर विरोधकांनी टीका केलीय. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, "टीका करणं त्यांचं काम आहे. मात्र, हे आम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करत नाही. याआधीही आम्ही अनेक प्रकल्पांचं लोकार्पण केलंय. तेव्हा कुठल्या निवडणुका होत्या का? अडीच वर्षे त्यांच्याकडं सत्ता होती. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पांना फक्त स्थगिती आदेश देण्याचं काम केलं. ते सुद्धा घरात बसून. त्यामुळं त्यांनी अडीच वर्षात जी घाण केली, ती आता आम्ही साफ करत आहोत आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय."
पंतप्रधान मोदी करणार सागरी सेतूची पाहणी : "या सागरी सेतूचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. आता या सागरी सेतूचं काम पूर्ण झाल्यानं त्याचं लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच करण्यात येईल. विशेष म्हणजे पंतप्रधान स्वतः या संपूर्ण सागरी सेतूची पाहणी करणार आहेत. संपूर्ण 22 किलोमीटर अंतर ते फिरणार आहेत," अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.
हेही वाचा :
- Bandra Versova Sea Link : वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या नामकरणावर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया
- अखेर ठरलं! मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचं 12 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन