मुंबई- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी ओढाताण सुरू आहे. एकीकडे सत्ता स्थापनेत ५०-५० च्या सूत्रावर तसेच मुख्यमंत्रीपद देण्याच्या मुद्यावर शिवसेना अडून आहे, तर पुढील ५ वर्ष आपणच मुख्यमंत्री राहणार, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अशा परिस्थितीत सत्ता स्थापनेसाठी भाजप कोणते नवे सूत्र घेऊन येणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी युतीबरोबरच सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगितले आहे.
सरकार स्थापनेवेळी शिवसेना आमच्यासोबत राहील - रावसाहेब दानवे - Rao Saheb Danve Legislative Council Meeting News
युतीचे सूत्र ठरलेले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी युतीचे सूत्र ठरवले होते. त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे. या चर्चेत जे ठरले त्यानुसारच सरकार स्थापनेची पुढील वाटचाल होणार आहे, असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.
आज विधान परिषदेत भारतीय जनता पक्षाची बैठक आहे. या बैठकीत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांकडून पक्षाचा नेता निवडला जाणार आहे. यावेळी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र निवडणूक लढविली होती. त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करताना शिवसेना आमच्यासोबत राहील असे, रावसाहेब दानवे म्हणाले. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये असलेल्या मतभेदाबाबात विचारले असता ते म्हणाले की, युतीचे सूत्र ठरलेले आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यात युतीचे सूत्र ठरले होते. त्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झालेली आहे. या चर्चेत जे ठरले त्यानुसारच सरकार स्थापनेची पुढील वाटचाल होणार आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यात कुठलाही वाद नसून त्यामुळे आम्हाला शिवसेनेची मनधरणी करण्याची गरज नसल्याचे केंद्रीय मंत्री दानवे म्हणाले.
हेही वाचा-राष्ट्रवादीचा शिवसेना अथवा भाजपला सत्तेसाठी पाठिंबा नाही- नवाब मलिक