मुंबई -'सगळं करून भागला आणि नंतर थकला' असा टोला सामनाच्या आग्रलेखातून काँग्रेसला लगावण्यात आला आहे. जनता अशा पक्षाला मतांचे टॉनिक द्यायला तयार नाही. नेते - कार्यकर्तेही या थकलेल्या पक्षात राहायला तयार नाहीत, काँग्रेस काय किंवा नावात काँग्रेस असलेला राष्ट्रवादी काय, दोन्ही 'थकलेल्या पक्षांची कहाणी ' ही अशीच आहे, असे म्हणत शिवसेनेने काँग्रेससह राष्ट्रवादीला धारेवर धरले आहे.
सलमान खुर्शीद यांनी तर महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष जिंकणे कठीण असून पक्षाचे भवितव्य अंधारात असल्याचे वक्तव्य केले होते. तर, सुशीलकुमार शिंदे यांनी 'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेस पक्षदेखील आता थकला आहे. ज्या मुद्दय़ावरून राष्ट्रवादी काँगेस पक्ष निर्माण झाला तो मुद्दादेखील आता उरलेला नाही. त्यामुळे भविष्यात काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेस परस्परात विलीन होतील असे भाकीत वर्तवले होते. काँग्रेसच्या या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या वक्तव्यावरूनच शिवसेनेने ही टीका केली आहे.