मुंबई - गोरगरीब आणि गरजूंना मोफत अन्न मिळावे, यासाठी स्थानिक आमदार यामिनी जाधव यांच्या पुढाकारातून भायखळा शिवसेना आणि नेश फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'कम्युनिटी फ्रिज' ही संकल्पना राबवण्यात आली आहे. माझगाव येथील बाप्टिस्टा उद्यानात 'कम्युनिटी फ्रिज' उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिवसेनेकडून 'कम्युनिटी फ्रिज' उपक्रमाचा शुभारंभ, अन्नदानाचे नागरिकांना आवाहन - मुंबईत शिवसेनेची कम्युनिटी फ्रिज सुविधा
शिवसेनेकडून 'कम्युनिटी फ्रिज' ही सुविधा राबवण्यात आली आहे. मुंबईतील माझगाव येथील बाप्टिस्टा उद्यानात 'कम्युनिटी फ्रिज' उपक्रमाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. गरजूंना मदत करण्याचे आवाहनही शिवसेनेच्या स्थानिक आमदार यामिनी जाधव यांनी यावेळी केले.
माझगाव येथील बाप्टिस्टा उद्यानाबरोबरच शिवसेना शाखा २०९मध्ये हा उपक्रम आता सुरू करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत भायखळ्यातील आणखी ८ ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात येईल, असे आमदार यामिनी जाधव म्हणाल्या. हा उपक्रम गोरगरिबांसाठी आहे. त्यामुळे, नागरिकांनी आपल्याकडील अन्न या 'कम्युनिटी फ्रिज'मध्ये दान करावे, ज्याचा गोरगरिबांना लाभ होईल, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
काय आहे "कम्युनिटी फ्रीज" ?
मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर राहतात. तसेच हातावर पोट असलेल्या लोकांची संख्याही मोठी आहे. रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना ठराविक वेळात अन्नदान केले जाते. मात्र, त्यांना भूक लागेल त्यावेळी अन्न मिळेलच, याची शाश्वती नसते. यासाठी "कम्युनिटी फ्रिज" ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. संकल्पनेनुसार या फ्रिजमध्ये दानशूर व्यक्ती आणि संस्था अन्न ठेवतील. गरजू व्यक्ती या फ्रिजमधून अन्न घेऊन भूक लागेल, त्यावेळी खाऊ शकणार आहेत. फ्रिजमध्ये अन्न असल्याने ते ताजेही राहणार आहे.