मुंबई- केंद्र सरकारने मंजूरी दिलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ३० दिवसांपासून पंजाब हरियाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलकांकडे लक्ष न देता स्वानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या प्रचारसाठी जाणाऱ्या मनोहरलाल खट्टर यांचा ताफा संतप्त शेतकऱ्यांनी अडवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर या शेतकऱ्यांवर हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगलीसह असे एकाहून एक गंभीर कलमे शोधून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यावरून शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून हरियाणाचे मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.
काय म्हटले आहे सामनात-
कृषी प्रधान देश असे बिरूद मिरवणाऱ्या देशातील शेतकरी खूनी, आतंकवादी नक्षलवादी आहेत का? केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात आंदोलन करने गुन्हा आहे. मात्र, हरियाणातील सत्ताधारी पक्ष आणि केंद्र सरकारातील नेते मंडळी या आंदोलनाला तसेच रुप देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नाला शेतकऱ्यांनी धुळ चारली असल्याचा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.
लोकप्रियतेनंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने प्रवास-
हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाचा जोर अधिक आहे. हरयाणातील खट्टर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला आणि हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा ताफा अडवण्यात आला. यानंतर सूडभावनेने खट्टर सरकारकडून काळे झेंडे दाखवणाऱ्या शेतकऱ्यांवर हत्या करण्याचा प्रयत्न आणि दंगलीसह कायद्याच्या पुस्तकातील एकाहून एक गंभीर कलमे शोधून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना खुनी आणि दंगलखोर ठरवणे म्हणजे लोकप्रियता घटल्यानंतर उतरती कळा लागून ऱ्हासाच्या दिशेने सुरू झालेला हा प्रवास आहे असेच म्हणावे लागेल, अशी टीकाही शिवसेनेने हरियाणातील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्या प्रकरणी केली आहे.
खट्टर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. अर्थात, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांच्या ताफ्याने दुसऱ्या मार्गाने मुख्यमंत्री खट्टर यांना प्रचाराच्या ठिकाणी सुरक्षितपणे पोहचविले. पण या घटनेनंतर सूडाने पेटलेल्या खट्टर सरकारने जी कारवाई केली ती संतापजनक असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे.