मुंबई- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्या टीकेला उत्तर देताना उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे आणावेत, असा टोला लगावला होता. त्यानंतर राऊतांच्या त्या वक्तव्याचा निषेध राज्यभरातून होत आहे. त्यासाठी विविध संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन त्यांनी आंदोलने केली.
हेही वाचा-'अजित पवार स्टेपनीवरून स्टेअरिंगवर'
सातारा - खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी पुकारलेल्या सातारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राऊत यांच्या वक्तव्यामुळे केवळ उदयनराजेच नव्हे तर छत्रपती घराण्याचा अपमान झाला आहे. हे सहन केले जाणार नाही, असे सांगत आज सातारा बंदची हाक देण्यात आली होती. आज सकाळपासूनच सातारा शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी आपले व्यवहार सुरू केले नाहीत. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उदयनराजे समर्थक मोठ्या प्रमाणावर राजवाडा येथे जमले होते.
हेही वाचा-'अमेरिकेनं ज्या पद्धतीनं दहशतवादाचा सामना केला, तसंच आपल्यालाही करावं लागेल'
पुणे-संजय राऊत यांनी नाक रगडून माफी मागावी नाही तर त्यांना ठोकून काढू, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. संजय राऊत जोपर्यंत माफी मागत नाहीत, तोपर्यत आम्ही शांत बसणार नाही, असेही क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
हेही वाचा-'राज्यपालांना डावलून सर्वोच्च न्यायालयात जाणं म्हणजे नियमांचे उल्लंघन'
औरंगाबाद - स्वराज्य युवा क्रांती संघाच्या वतीने संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांनी औरंगाबादला यावे, आम्ही पुरावे देऊ, अस प्रतिआव्हान आंदोलकांनी यावेळी केले. एका बंद खोलीत वक्तव्य करण्यापेक्षा राऊत यांनी बाहेर हे वक्तव्य करून दाखवावे, असे म्हणत राऊत यांच्या विरोधात औरंगाबादच्या क्रांती चौक भागात घोषणाबाजी करत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा-चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठण्याच्या शक्यतेवर डॉ. अभय बंग यांची संतप्त प्रतिक्रिया
अहमदनगर- शिवसेनेचे खाजदार संजय राऊत यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकत्यांनी राऊत यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारुन प्रतिमेचे दहन केले. यावेळी भाजप बेलापूर शहर अध्यक्ष प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्म भराटे, राकेश कुंभकर्ण यांच्यासह कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
हेही वाचा-मदुराईमधील जल्लीकट्टू स्पर्धेत ७०० हून अधिक बैल सहभागी
जालना- शहरातील मराठा सेवा संघाच्या वतीने संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागितल्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे जालना मराठा सेवा संघाच्या वतीने राऊत यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष देशमुख यांच्यासह सुभाष चव्हाण, अशोक पडूळ, अनिल मदन, कमलेश काथवटे, संतोष चोळसे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा-इंदिरा गांधींबाबतच्या विधानावरून संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये शीतयुद्ध !