महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 28, 2020, 1:09 PM IST

ETV Bharat / state

ईडी व सीबीआय विरोधात संजय राऊतांचे वादग्रस्त ट्विट; दिली श्वानांची उपमा

खासदार संजय राऊत त्यांच्या खुमासदार आणि थेट वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असतात. आता पुन्हा त्यांनी एक वादग्रस्त ट्विट केले आहे. यावरून भाजपा आणि शिवसेना वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई - सक्तवसूली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण‍ ब्युरो (सीबीआय) या दोन्ही केंद्रीय संस्थांविरोधात शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी एक वादग्रस्त ट्विट केले. दोन्हीही संस्थांना त्यांनी श्वानांची उपमा देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी केलेले वादग्रस्त ट्विट

आज राऊत यांनी ईडी आणि सीबीआय यांचे नाव लिहीत दोन श्वानांची उपमा दिली आहे. महाराष्ट्राच्या दिशेने कूच करणाऱ्या या दोन श्वानांतील संवाद त्यांनी मोजक्याच शब्दात दिला आहे. त्यात सीबीआय असे लिहिलेला श्वान ईडीच्या श्वानाला सांगतो, 'रूक, अभी तय नहीं हैं किसके घर जाना है...' असे विधान टाकले आहे. ईडी आणि सीबीआय स्वायत्त असूनही केंद्राच्या सांगण्यावरून काम करतात असे राऊत यांनी दाखवले आहे. यावरून आता पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारला दिले आव्हान -
मागील काही दिवसांपूर्वी सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी व कार्यालयांमध्ये ईडीने छापेमारी केली. त्यांच्यावर ही कारवाई सुरू झाल्याने राज्यात तीव्र पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. ज्या पक्षाच्या नेत्यांची संपत्ती वाढली, अनेकजण देशातील बँका, संस्थांना लुटून देश सोडून गेले, त्यांच्यावर ईडी कधी कारवाई करणार, असे विचारत केंद्राच्या भूमिकेवर राऊतांना प्रश्न उपस्थित केले होते. मी केंद्राच्या सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांच्या नावांची यादी अर्थमंत्रालयाला आणि ईडीलाही पाठणार आहे. त्यातील किती जणांना ईडी नोटीस पाठवून कारवाई करते, ते पाहूया, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारला आव्हान दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details