मुंबई- पोलीस सहायक निरीक्षक सचिन वाझे प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह वादात सापडलेले होते. त्यांची बदली करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत होती. आज अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बदलीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये, असे म्हटले आहे.
मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळाले आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल, या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखली जाईल हीच अपेक्षा, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचे प्रकरण दिवसेंदिवस गाजत आहे. या प्रकरणामध्ये मुंबई पोलीस सीआयुचे अधिकारी सचिन वाझे यांचे देखील नाव समोर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे. सचिन वाझे यांना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझेंची सध्या चौकशी सुरू असून यामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचेही नाव या वादात सापडले होते. या पार्श्वभूमीवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी राज्य सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आल्याचे आता सांगितले जात आहे.