मुंबई - महाराष्ट्रातील जनतेने युतीला महाजनादेश दिला आहे. मात्र, राज्यातील एखादा मंत्री १५ दिवसात राज्यात राष्ट्रपती राजवटीची भाषा करीत असेल, तर हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. लोकशाही मानणाऱ्या नेत्यांना ही भाषा शोभून दिसत नाही. राष्ट्रपती काही कोणाच्या खिशात नाही, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी विलंब होत आहे. यावर नुकतेचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे म्हटले होते. त्यावरच संजय राऊत यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी उशिर होत आहे. मात्र, हा पहिलाच प्रसंग नसून भाजपशासित राज्यात असे प्रकार अनेकवेळा झालेले आहेत. कायदा, संसदीय लोकशाही, नियम सर्व आम्हालाही कळतात. गेल्या ५५ वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आता उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना राजकारण करीत आहे, असे राऊत म्हणाले.