मुंबई -मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तुम्हीच जबाबदार आहात, अशा शब्दांत फटकारले होते. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला फटकारले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत व्यक्त केलेली भावना आम्ही आधीपासूनच मांडत होतो. देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना निवडणुकीसाठी इतक्या लोकांनी एकत्र यावे हे योग्य नाही. हेच लोक मग देशभरात जाऊन कोरोनाचा अधिक फैलाव करतील. मग निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय कुंभमेळा भरवला त्याचं काय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र -
राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर सर्वांनी मतभेद विसरून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे. मोदी जे धोरण बनवतील त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असंही राऊत म्हणाले.