मुंबई -कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडची जागा आपल्या मालकीचा असल्याचा दावा केंद्राने केला. केंद्राच्या या दाव्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. या विषयावरून अनेक राजकीय नेते टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत. आता त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या सात बारावर दिल्लीचे नाव कोणी लावले? असा संतप्त सवाल राऊत यांनी केंद्र सरकारला विचारत, मुंबईची इंच इंच जमीन फक्त महाराष्ट्राचीच आहे. मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार, असे ठणकावले आहे.
काय आहे प्रकरण –
राज्य सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरला हलवण्याचा प्रस्ताव पारित केला. यानंतर कारशेडचे कांजूरला हलवण्यात आले. तिथे कारशेडचे कामही सुरू झाले. तेव्हा कांजूरमार्ग येथील प्रस्तावित कारशेडची जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत तेथील कारशेडचे काम थांबविण्याची सूचना केंद्राने राज्य सरकारला पत्राद्वारे केली. तसेच या पत्रात, कांजूरच्या त्या जागेवर कोणी काम केल्यास कारवाईचा इशारा देखील दिला आहे.