मुंबई - शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री मंडळात शिवसेनेचे मंत्री म्हणून अरविंद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. सावंत हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
नरेंद्र मोदी आज सायंकाळी ७ वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये एनडीच्या प्रत्येक घटकपक्षातील फक्त एका खासदाराला मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील भाजपचा प्रमुख सहकारी पक्ष शिवसेनेने त्यांच्या मंत्र्यांचे नाव घोषीत केले आहे.
शिवसेनेचे १७व्या लोकसभेत १८ खासदार निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेनेकडून लोकसभेत सर्वाधिकवेळा निवडून येण्याचा मान यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील खासदार भावना गवळी यांना जातो. १७व्या लोकसभेत त्या शिवसेनेच्या सर्वाधिक ज्येष्ठ खासदार म्हणून ओळखल्या जातील. लोकसभेचा सर्वाधिक अनुभव असलेल्या गवळी यांची मंत्रीपदी वर्णी लागणार अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या पाच लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना पराभूत करून गवळी यांनी सलग पाचवेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे यंदा त्यांना मंत्रीपद देऊन शिवसेना त्यांचा योग्य सन्मान करणार अशी आशा यवतमाळ-वाशिमच्या शिवसैनिकांना होती. मात्र, पक्षनेतृत्वाने मुंबईतील खासदार सावंत यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.