मुंबई- अयोध्येच्या वादग्रस्त जागेचा निकाल लागल्यावर पुन्हा एकदा रामलल्लाच्या दर्शनाला अयोध्येला जाणार, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेपूर्वी म्हटले होते. अखेर लवकरच उद्धव ठाकरे त्यांचा शब्द पूर्ण करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता विजयी आमदारांना घेऊन अयोध्या निकालानंतर प्रथमच रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांना घेऊन अयोध्येला येतो, असे म्हटले होते. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आले आहे. त्यामुळे आमची इच्छा आहे की त्यांनी सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला जावे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री आमदारांसह अयोध्येला कधी जाणार याची तारीख निश्चित केली जाईल, असेही राऊत यांनी सांगितले.