मुंबई Priyanka Chaturvedi On MLA Disqualification Result :सुमारे दीड वर्षापासून सुरू असलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल अखेर बुधवारी (10 जानेवारी) लागला. या प्रकरणात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टात सुमारे वर्षभर सुनावणीवर सुनावण्या होत निकालाचा चेंडू अखेर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आला. त्यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची असून 16 आमदारही पात्र असल्याचा निकाल दिलाय. तसंच ठाकरे गटाच्याही कोणत्याच आमदाराला अपात्र ठरवण्यात आलेलं नाही.
एकीकडं या निकालानंतर शिंदे गटात जल्लोषाचे वातावरण बघायला मिळतंय. तर दुसरीकडं ठाकरे गटाचे नेते या निर्णयावरुन टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी राहुल नार्वेकर यांच्या निकालावर टीका केली आहे. तसंच "वही होता है, जो मंजूरे नरेंद्र मोदी और अमित शाह होता है", असंही त्या म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी : विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर प्रियंका चतुर्वेदी यांनी जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, “विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. आपण लहानपणापासून 'वही होता है, जो मंजूरे खुदा होता है', ही म्हण ऐकत आलोय. देश प्रजासत्ताक झाल्यानंतर ‘जो मंजूरे संविधान होता है’, असं म्हटलं गेलं. मात्र, 2014 पासून 'वही होता है, जो मंजूरे नरेंद्र मोदी और अमित शहा होता है'. महाराष्ट्रात आता हेच बघायला मिळतंय."
चोरी झालेलं सामान चोरांचंच :खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, “पक्षाअंतर्गत लोकशाहीची गोष्ट बोलली जात आहे. मात्र, हाच प्रश्न एकदा भारतीय जनता पार्टीला एकदा विचारा. त्यांच्याकडं तर पक्ष सोडाच युतीमध्ये लोकशाही नाही. पक्षाअंतर्गत लोकशाही नव्हती, तर गद्दारांनी एबी फॉर्म का नाकारले नाहीत. हा निर्णय काहीही आला असला तरी जनतेला सत्य माहित आहे. ही गोष्ट तर अशी झाली की, ज्याच्या घरी चोरी झाली त्यानच पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलीस सांगत आहेत की चोरी झालेलं सामान हे चोरांचंच आहे, मालकांचं नाही”, अशा शब्दात चतुर्वेदी यांनी टीका केली.
हेही वाचा -
- "स्वतःला पक्षप्रमुख म्हणणारे आता घटनाबाह्य झाले", शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- शिंदे गटात जल्लोष; प्रभू रामाचा आशीर्वाद, बाळासाहेब ठाकरे यांचा हा विजय आहे - दादा भुसे
- शिवसेनेच्या निकालानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार टीका, वाचा कोण काय म्हणाले?