मुंबई - Result of disqualification of MLA आमदार अपात्रतेची लढाई ही मागील दोन वर्षापासून आरोप प्रत्यारोप, न्यायालयीन लढा आणि विधिमंडळाच्या स्तरावर लढली गेली असून अखेर हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या प्रकरणी निकालाची जबाबदारी ही विधानसभा अध्यक्षांकडे सोपविली गेली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एकंदरीत वागणुकीवर अनेकदा उद्धव ठाकरे गटाकडून प्रश्न उपस्थित केले गेले. अखेर आज या प्रकरणाचा अंतिम निकाल येणार आहे. या निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे सहकारी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. तसेच निकालानंतर या दोन्ही गटाकडे काय पर्याय असतील. त्यासोबत या निकालाचा येणाऱ्या निवडणुकीत जागा वाटपावर किती प्रभाव पडू शकतो, हे पाहणे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही गटाचे पारडे जड - यापूर्वी निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हीच मूळ शिवसेना असल्याचा निवाडा देत त्यांना पक्ष व चिन्ह बहाल केले होते. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे पारडे जड मानले जाते. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पाहिला असता उद्धव ठाकरे गटाचे पारडे जड वाटते. अशा परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निवडणूक आयोगाच्या निकालाला महत्त्व देतात की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला महत्त्व देतात यावर आजचा निकाल अवलंबून असणार आहे. निकाल देण्याच्या दोन दिवसांपूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा निकाल एकतर्फी तर जाणार नाही ना? अशी शंका उद्धव ठाकरे यांच्या गटात निर्माण निर्माण झाली. तशा पद्धतीच्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटातील नेत्यांनीही दिल्या आहेत.
शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास...राज्यातील या सत्ता नाट्याच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार अपात्र ठरल्यास मुख्यमंत्र्यांना तात्काळ राजीनामा द्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर तांत्रिकदृष्ट्या सरकार कोसळेल. परंतु सरकारमधील अजित पवार गटाच्या समावेशामुळे महायुतीकडे बहुमतापेक्षा अधिक आमदार असल्याने सरकार स्थिर राहील. परंतु मुख्यमंत्रीपद हे दुसऱ्याकडे जाऊ शकतं. कारण अपात्र झालेले शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्र्यांची शपथ घेऊ शकणार नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना विधानपरिषदेवर निवडून आणलं जाऊ शकतं, अशी शक्यता खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यापूर्वीच बोलून दाखवली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास.. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय लागल्यास त्यांचे सरकार टिकेल. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवले जाऊन त्यांची आमदारकी धोक्यात येईल. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसणार आहे. परंतु हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेल्यास शिंदे गटाचे पारडे मजबूत होणार आहे.