मुंबई -महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तेवर येऊन एक महिना झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवेळी ६ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, ऊर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला. ऊर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार आज दुपारी होणार असून एकूण 36 आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी यादीवर अंतिम खलबते होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठीअजित पवार, नवाब मलिक, धनंजय मुंडे, अदिती तटकरे आणि राजेश टोपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर दुसरीकडे मात्र शिवसेनेच्या आमदारांना अजूनही 'तो' विशेष फोन 'मातोश्री'वरून आला नसल्याने सेनेच्या आमदारांची घालमेल वाढली आहे. दिल्लीत काँग्रेसच्या मंत्र्यांची यादी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते, तर गृह खातेही राष्ट्रवादीकडे येणार असल्याची दाट चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच नेत्यांच्या नावांव्यतिरिक्त दिलीप वळसे पाटील, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. दत्ता भरणे आणि डॉ. किरण लहामरे या नव्या चेहऱ्यांना देखील पवार संधी देण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या गोटात अशोक चव्हाण, अमित देशमुख, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, अमीन पटेल यांची नावे निश्चित मानली जात आहेत. तर के. सी. पाडवी, संग्राम थोपटे, विश्वजीत कदम यांच्या नावाचीही पक्षात जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा -...तर महाराष्ट्रातील कानडी लोकांचे कपडे काढून हाकलू