मुंबई - गेल्या तीन महिन्यापासून मुंबईतील हवेचा निर्देशांक सातत्याने कमी होत चालला आहे. मुंबई आणि एमएमआर विभागात हवेची गुणवत्ता वाईट आणि अत्यंत वाईट अशी नोंदवली जात आहे. यातच वाढत्या थंडीमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर या सर्वांचा परिणाम होत आहे. या विरोधात अनेकजण आवाज उठवत आहेत, आपणही याबाबत सातत्याने बोलत आहोत. मात्र, राज्य सरकार राज्याच्या आणि मुंबईच्या वाढत्या प्रदूषणाबाबत गप्प आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे.
आदित्य ठाकरेंची टीका -वाढत्या प्रदूषणाबाबत देशातील अनेक राज्यांनी नियमावली तयार केली. मात्र, प्रदूषणाबाबत राज्य सरकारने अद्यापही कोणतीही नियमावली तयार केलेली नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातील शाळा कॉलेज किंवा इतर शैक्षणिक संस्थेबाबत नियमावली तयार करणे गरजेचे आहे. मात्र, राज्य सरकारने नियमावली तयार केलेली नाही. याउलट मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. सामान्य नागरिकांच्या आरोग्याकडे सरकार कानाडोळा करत आहे, असे आपल्या ट्विटमधून आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आपण पर्यावरण मंत्री असताना सोलापूर, मुंबई, पुणे अशा अनेक महत्त्वाच्या शहराचे क्लायमेट चेंज ॲक्शन प्लॅनमध्ये सहभागी झालो होतो. यासाठी त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारने काही प्लॅनही तयार केले होते. मात्र, आता याबाबत राज्य सरकार काही ठोस पावले उचलत नाही, असे या ट्विटमधून आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.