मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत पंढरीनाथ आंबेडकर यांचा फोटो ट्विट केला आहे. तसेच पत्रकार शशिकांत वारीशे हत्याप्रकरणी उदय सामंत यांची ही चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटला पालकमंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ही आपली बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
तो फोटो जुना आहे:संजय राऊत यांनी ट्विट केलेला फोटो हा जुना फोटो आहे. एखाद्या कार्यक्रमात पंढरीनाथ आंबेडकर यांच्यासोबत आपला फोटो असू शकतो. असे अनेक जण सोबत फोटो काढतात पण त्यामुळे काही त्यांच्या कृत्यांमध्ये संबंधित नेत्याचा संबंध असू शकत नाही. अथवा समर्थन असू शकत नाही. त्यामुळे संजय राऊत हे जाणून बुजून आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा दावा उदय सामंत यांनी केला आहे. रिफायनरीच्या संदर्भात लोकभावना असू शकतात त्यांचा आम्ही आदर करतो. परंतु त्यासाठी विरोध म्हणून एखाद्या पत्रकाराला संपवावे असा कुणीही प्रयत्न करणार नाही. ज्यांनी अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे. आंबेरकरांवर ताबडतोब खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी सूचना मी पोलीस अधीक्षकांना दिली आहे. त्यामुळे याबाबत कशाचेही समर्थन होणार नाही असेही सामंत म्हणाले.
नुकसान भरपाई मिळावी: पत्रकार शशिकांत वारीचे यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी आपण सर्व तोपरी मदत करत आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी अशी पत्रकार संघटनांची मागणी आहे. तशीच ती इतरांची ही मागणी आहे, त्याप्रमाणे आपण सरकारकडे त्याचा पाठपुरावा करीत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.