मुंबई -कोरोना विषाणूमुळे राज्यात भीषण परिस्थिती असताना दुसरीकडेअभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा वाद रंगला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज कंगना वादावर 'नो कमेंट' असे म्हणत काहीही बोलण्यास नकार दिला.
'आज दिवसभर मी कार्यालयामध्ये होतो. मी काहीही पाहिलेले नाही, मला आज काहीच माहिती नाही,' असे उत्तर संजय राऊत यांनी दिले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर संजय राऊत माहिती नाही, एवढेच म्हणाले. तसेच कंगनाला महापालिका 'क्वारंटाईन' करणार का? असा प्रश्नही संजय राऊत यांना विचारला, तेव्हा याबाबत महापौर सांगतील असे ते म्हणाले. सामना कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
विधीमंडळात काल कंगना रणौत विरोधात हक्कभंग दाखल झाल्यानंतरही ती आज मुंबईत पोलीस बंदोबस्तात दाखल झाली. खबरदारी म्हणून कंगना विषयावर बोलू नका, आंदोलनेही करू नका, असे सक्त आदेश मातोश्रीवरून पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना देण्यात आले आहेत. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाच्या काही भागाचे पाडकाम महापालिकेने केले. याबाबत न बोलण्याचा पक्षादेश शिवसेनेने दिला आहे. मुंबई मनपाने ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचा आरोप भाजपने केला. कंगना प्रकरणावर शिवसेनेने मात्र आता मौन बाळगले आहे. होईल ती कायदेशीर कारवाई, अशीच भूमिका शिवसेनेने घेतली आहे.