मुंबई - खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे हा विषय आता संपायला हवा, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवरुन उफाळलेल्या वादावर उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. त्यानंतर संजय राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे कोणीही राजकारण करु नये, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. त्यांनी काही चुकीचं म्हटलं नाही, शिवाजी महाराजांबाबत वाद वाढायला नको अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
राज्यसभेत शपथ घेताना भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. मात्र, सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यावर आक्षेप घेत, कोणत्याही घोषणा न देण्याचे आवाहन नवीन राज्यसभा सदस्यांना केले होते. यावरुन महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या संतप्त प्रतिक्रिया येत होत्या. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी सेनेवर निशाणा साधला होता.
काय म्हणाले संजय राऊत
जय भवानी जय शिवाजी ही घोषणा नियमबाह्य किंवा घटनाबाह्य आहे असं कधीच वाटलं नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं घोषणा दिल्या आहेत. हा वाद वाढू नये असे आम्हालाही वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यासंबंधित कोणत्याही घोषणा या घटनाबाह्य नाहीत, नियमबाह्य नाहीत हे आम्हाला सांगायचं आहे. इतर पक्ष त्याबाबत काय करतात त्यावर मी मत व्यक्त करणार नसल्याचे राऊत म्हणाले.
नायडू नियमाने वागले
छत्रपती शिवाजी महाराज ही जय ही घोषणा ही वंदे मातरम आणि जय हिंद इतकी महत्त्वाची असल्याचे माझं मत असल्याचेही राऊत म्हणाले. जेव्हा शिवसेनेच्या संदर्भात असे विषय निर्माण झाले होते आणि त्याच राजकारण त्या काळात झालं होतं. तेव्हा भाजपचे काही प्रमुख लोकांनी त्यांची भूमिका त्यांनी व्यक्त केली. राज्यसभेत जे घडलं त्यावर व्यक्त व्हायला हवं. माझ्या मते नायडू नियमाने वागले अस माझं मत आहे. त्यांच्या इतकं संसदेच नियम माहीत असलेला नेता मी त्या चेअरवर पाहिला नाही. आम्ही सगळं त्यांचं ऐकतो आणि त्यांच आदर करतो असे राऊत यांनी व्यंकय्या नायडू यांच्याबाबत देखील मत स्पष्ट केलं.
मला वाईट यासाठी वाटलं कारण आमच्या सारख्या मावळ्यालाही महान करण्याच काम शिवाजी महाराजांनी केलं आहे. भावना आणि नियम या दोन गोष्टी आहेत. राजकीय पक्षाचा नेता यापेक्षा मी शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी व्यक्त झालो तो अधिकार सर्वांना अधिकार असल्याचे राऊत म्हणाले.
उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, हा विषय आता संपायला हवा
बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हा विषय नाही, विषय आहे जय शिवाजी, जय भवानीचा, त्यावरच बोलू, असं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना भवनावरील बाळासाहेबांच्या फोटोचा प्रश्न टाळला. जय शिवाजी, जय भवानी हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. सीमेवरील जवानही हा जयघोष करतात, उद्या तुम्ही वंदे मातरम, जय हिंदला आक्षेप घ्याल, ते चालणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.