मुंबई -राज्यात भाजपाशी युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजपाकडून शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावरून भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात आली आहे. याबाबत पांडुरंग सपकाळ यांच्याशी संपर्क साधला असता मी स्पर्धा आयोजित केलेली नाही. माझ्याकडे मुस्लिम शिष्टमंडळ आले होते. त्यांना तुम्ही अशी स्पर्धा आयोजित करा, अशी शिफारस केल्याचे पांडुरंग सपकाळ यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले पांडुरंग सपकाळ -
शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धेचे आयोजन केले आहे. बसीरत ऑनलाईनशी संवाद साधताना पांडुरंग सपकाळ यांनी अजान स्पर्धेची माहिती दिली. याबद्दलचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अजानमध्ये फार गोडवा असतो. ती ऐकदा ऐकल्यावर पुन्हा कधी ऐकायला मिळेल, असे मनाला वाटतं राहते, अशा शब्दांत सपकाळ यांनी अजानचे कौतुक केले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आम्ही अजान स्पर्धेचं आयोजन करणार आहोत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आवाज, उच्चार हे निकष असतील. ते किती मिनिटांत अजान संपवतात, कशी प्रकारे म्हणतात, याकडे मौलाना लक्ष देतील. ते परीक्षक म्हणून काम पाहतील. अजान उत्तम प्रकारे म्हणणाऱ्या मुलांना शिवसेनेकडून बक्षीसे दिली जातील. या संपूर्ण स्पर्धेचा खर्च शिवसेना करेल, असे सपकाळ यांनी सांगितले. काहींना अजानच्या आवाजामुळे त्रास होतो, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न सपकाळ यांना विचारण्यात आला. त्यावर सगळेच धर्मग्रंथ मानवता आणि शांततेची शिकवण देतात. अजानचा कालावधी फार कमी वेळ असतो. त्यामुळे अजानच्या आवाजाबद्दल अडचण वाटण्याचे काहीच कारण नाही. याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सपकाळ म्हणाले आहेत. आम्ही मानवतेच्या दृष्टीकोनातून समाजासाठी काम करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सर्वांना सोबत घेऊन काम करत आहेत, असेही त्यांनी पुढे सांगितले.