मुंबई -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(23 जानेवारी) ९५वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभरातून शिवसैनिक बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी शिवाजीपार्क येथे जमले आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन कार्यक्रमाची तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून बाळासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे. सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी येणार आहेत.
शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी गर्दी केली आहे राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज राज्यभरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. शिवसेनेसह विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनी रक्तदान शिबीर, क्रीडा स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना योद्धयांचा सन्मान, आरोग्य तपासणी शिबीर, अवयवदान शिबीर, रुग्णांना फळवाटप, ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे सावट अजूनही कायम असल्यामुळे शिवसैनिकांकडून मास्क देखील वाटण्यात आले.
सहाशे किलोमीटरचा प्रवास करून 'तो' पोहचला स्मृतिस्थळावर -
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी परभणी जिल्ह्यातून रामचंद्र गायकवाड सायकलवरून 600 किलोमीटरचा प्रवास करून स्मृतिस्थळावर पोहचले आहेत. गेल्या चार वर्षांपासून मी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सायकलने येतो. सहा दिवसाचा कालावधी मुंबईत पोहचण्यासाठी लागतो. दर दिवशी 100 किलोमीटर असा प्रवास मी करतो. याठिकाणी येऊन खूप बरे वाटते, असे गायकवाड यांनी सांगितले.