मुंबई -राज्यसभेत उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीनंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. राज्यात विविध ठिकाणी याचा निषेध व्यक्त केला जात आहे. मुंबई पूर्व उपनगरातील भांडूप, विक्रोळी आणि पवईमध्ये शिवसैनिकांनी व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात संताप व्यक्त करत तीव्र घोषणाबाजी केली.
व्यंकय्या नायडूंच्याविरोधात शिवसेनेची मुंबईत विविध ठिकाणी निदर्शने विक्रोळीत आमदार सुनिल राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. व्यंकय्या नायडू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध केला. त्यामुळे ढोंगी भाजपा सरकार आणि नायडूंचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत, असे शिवसैनिकांनी सांगितले. भांडुपमध्ये आमदार रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनातही नायडू आणि भाजपाविरोधी घोषणाबाजी झाली.
भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज देत 'हे माझे सभागृह आहे, येथे घोषणा चालणार नाहीत, आपण नवीन आहात, यापुढे ही बाब लक्षात असू द्या' असे सांगितले.
या सर्व प्रकारावरुन महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, राजकीय वातावरणही तापले आहे. 'निवडणुकीसाठी भाजपाला शिवाजी महाराजांचा फोटो चालतो आणि संसदेत शपथ घेताना महाराजांच्या नावाच्या उल्लेख चालत नाही. भाजपाचा महाराष्ट्र द्वेष यानिमित्ताने समोर आला आहे, असे पवईतील शाखा प्रमुख सचिन मदने यांनी सांगितले.