मुंबई- शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर अजुनही ठाम आहे. विशेष कायदा करा आणि राम मंदिर उभारा ही शिवसेनेची मागणी आहे. असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील दसरा मेळाव्या दरम्यान म्हटले आहे. यावेळी विधानसभेच्या प्रचाराचे बिगुल वाजवत शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीवर खरपुस टीका केली. मात्र, यावेळी आरे प्रकरणाचा उल्लेख करणे त्यांनी टाळले.
या शिवसेनेने भगवा दिलाय आणि तो रंग घेऊन मी पुढे निघलो आहे. भगवा फडकवण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो आहे. राम जन्मले होते की नाही यावर वाद चालू आहे. असे कुठेच जगात चालले नसेल. या महिन्यात न्यायालयाने निकाल दिला तर आनंद आहेच. आम्हाला या देशात राम मंदिर पाहिजे. शिवसेना भाजप युती आहे. आमचा कारभार प्रभू रामचंद्र सारखा आहे. राम मंदिर बांधायचे आणि वचन तोडायचे हे आम्हाला पटत नाही. धनुष्यबाण निशाण घेतले तेव्हा राम मंदिर हा विषयही नव्हता. आजही आमची मागणी आहे की विशेष कायदा करून राम मंदिर बांधा. प्राण जाये पण वचन न जाये ही शिवसेनेची नीती, असे उद्धव यांनी यावेळी सांगितले.
मागील 30 वर्ष राम मंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर बोलू नका असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. तसेच शिवसेनेच नाव न घेता राममंदिर प्रकरणी बडगोले अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत केली होती. त्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव न घेता अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले की, या महिन्यात कोर्टाने राम मंदिराचा निर्णय दिल्यास त्याचे स्वागत आहे. राम मंदिर बांधायचे आणि वचन तोडायचे हे आम्हाला पटत नाही. त्यामुळे आम्हाला या देशात राम मंदिर पाहिजेच असे उध्दव ठाकरे म्हणाले.