मुंबई - शेजारी देशातून भारतात घुसखोरी केलेल्या बिगर मुस्लिम नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी सरकार नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणत आहे. यावर भाजपचा एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून टीका केली आहे. या विधेयकाच्या निमित्ताने भाजप मतपेटीचे राजकारण करत आहे. ते देशाच्या हिताचे नाही असे शिवसेनेने म्हटले आहे.
देशात आधीच अनेक समस्या आहेत. त्यात बाहेरची ओझी छाताडावर घेतली जात आहेत. यात राष्ट्रहीत किती आणि व्होट बँकेचे राजकारण किती यावर शिवसेनेने शंका उपस्थित केली आहे. हिंदू मुस्लिम फाळणी करण्याचा घाट भाजपने घातल्याचा थेट आरोप शिवसेनेने केला आहे. एरव्ही हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपला समर्थन देणारी शिवसेना भाजपवर धार्मिक ध्रुविकरणाचा आरोप करते आहे हे बदललेल्या परिस्थितीचे द्योतक म्हणावे लागेल.
हेही वाचा -गृहमंत्री अमित शाह आज नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडणार
भाजपला शिवसेनेचे शालजोडे
भाजपच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला भाजप शासीत राज्याकंडूनही विरोध होत आहे. ईशान्येकडील राज्यांचाही याला कडवा विरोध आहे. शिवसेनेने घुसखोरांना हाकलायला हवे या भाजपच्या मताशी सहमती दर्शवली आहे. पण, यामुळे धर्मयुद्धाची ठिणगी तर पडणार नाही ना अशी भीती व्यक्त केली आहे.
ईशान्येकडील राज्यांनी या घुसखोरांना स्वीकारण्यास स्पष्ट विरोध केला आहे. त्यामुळे यांना स्वीकारण्याची जबाबदारी भाजपशासीत गुजरातची आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरही मानवतावादी दृष्टीकोनातून याची जबाबदारी येऊन पडते असा टोमणा शिवसेनेने मारला आहे. ३७० हटवूनही काश्मिर खोऱ्यात पंडितांना पाय ठेवता आला नाही. त्यामुळे या बाहेरील देशातील निर्वासीतांना येथे बसवता येईल का असा सल्ला शिवसेनेने अग्रलेखातून दिला आहे.
हेही वाचा -नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला समर्थन देऊ नका; भाजपच्या मित्र पक्षांना काँग्रेसचे आवाहन
शिवसेनेने सुचवले उपाय
भाजपच्या या निर्णयामागे व्होट बँकेचे राजकारण असल्याची शंका शिवसेनेने व्यक्त केली आहे. भाजपचा हेतू मानवतावादी असेल तर त्यांनी आमच्या सूचना ऐकाव्यात असे शिवसेना म्हणते. बाहेरून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व द्यावे पण पुढचे २५ वर्षे त्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये. दुसऱ्या देशातील हिंदू, जैन आदी अल्पसंख्यकांवर अत्याचार होतात. त्यामुळे मोदींनी त्यांना अद्दल घडवावी. त्या देशातील अल्पसंख्यकांना संरक्षण द्यावे असे शिवसेनेने भाजपला सुचवले आहे.