मुंबई- सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कुरकुरणे सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे
काँग्रेस पक्ष हे जूने पक्ष आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे. या जुन्या खाटेवर कूस बदलणारेही बरेच आहेत. त्यामुळे हे कुरकुरणे जाणवू लागले आहे. आघाडीच्या सरकारात अधूनमधून असे कुरकुरणे सहन करण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठेवली पाहिजे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे कुरकुरणेही तसे संयमी असते. घरात भावाभावांची भांडणे होतात. इथे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोडेफार कुरकुरणे होणारच. मुख्यमंत्र्यांना भेटून काय ते बोलू, असे थोरातांनी सांगितले. त्याच खाटेवर बसलेल्या अशोक चव्हाण यांनीही एका माध्यमाला मुलाखत दिली व तितक्याच संयमाने कुरकुरत सांगितले की, सरकारला अजिबात धोका नाही, पण सरकारमध्ये जरा आमचेही ऐका. प्रशासनातील अधिकारी म्हणजे नोकरशाही वाद निर्माण करीत आहे. आम्ही काय ते मुख्यमंत्र्यांशीच बोलू, आता असे ठरल्याचे समजते की, कुरकुरत्या खाटेवरचे हे दोन मंत्रीमहोदय मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे म्हणणे मांडणार आहेत असा उल्लेख ही अग्रलेखात केला आहे.