मुंबई- दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन दिवसांवर असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. त्यामुळे राममंदिराचे राजकारण होऊ नये, असे वाटत होते. मात्र, दिल्ली विधानसभेसाठी मंदिराचा पाया रचला आणि लोकसभेच्या निमित्ताने 2024 ला कळस उभारला जाईल, अशी खोचक टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपवर करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी भाजपचा घाम काढला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शेवटी भाजपला श्रीरामांना मध्ये आणावे लागले, असा टोलाही सेनेने लगावला आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिर निर्माण करण्यासाठी जे ट्रस्ट जाहीर केले आहे, यासाठी त्यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे. तर हे ट्रस्ट किती स्वंतत्र किंवा सार्वभौम असेल हे 15 सदस्यांच्या नेमणुका झाल्यावरच कळेल, असे खोचक टोमणाही त्यांना हाणला आहे.