मुंबई -शिवसेनेचे मुखपत्र असलेल्याआजच्या 'सामना'च्या' अग्रलेखातून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेला आहे. 'राजभवनातील तोफा (गंजलेल्या)' या शीर्षकाच्या अग्रलेखातून भाजपाचा यथेच्छ समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर सडकून टीका करण्यात आली. तसेच कोरोना संकट नसते तर सरकारने सहा महिने पूर्ण केले, या आनंदाप्रीत्यर्थ विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घातले असते, असेही अग्रलेखात म्हटले आहे.
राजभवनाच्या दारात उभे राहून राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे, आता नेहमीचेच झाले आहे. ही मागणी त्यांनी गुजरातेत जाऊन करण्याची हिंमत दाखवावी. महाराष्ट्रात त्याची गरज नाही, असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.
सरकार बनवणारे व सरकार पाडू इच्छिणारे, असे सगळेच जण राजभवनाच्या पाहुणचाराचा आनंद घेत असतात. या आनंदास गेल्या काही दिवसांत भरते आल्याचे दिसत असेल तर त्यात सध्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा काय दोष? ते एक सरळमार्गी, नाकासमोर चालणारे एक विचारी सद्गृहस्थ आहेत. ‘संघ विचाराचा झेंडा खांद्यावर घेऊन आयुष्य वेचणारे ते एक संतमहात्मा आहेत.’ राजभवनात बसून राजकीय काड्या घालण्याचे उद्योग असे संतमहात्मे करतील, यावर विश्वास ठेवता येणार नाही. मधल्या काळात राजभवनात पैपाहुण्यांची वर्दळ वाढली आहे व राज्यपालही स्वत: जातीने या पैपाहुण्यांची सरबराई करीत आहेत. हे एक प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृतीलाच साजेसे नाही काय?' असा टोला विरोधकांना लगावण्यात आला आहे.
ठाकरे सरकार अकरा दिवसही टिकणार नाही, असे बोलणार्यांचे बारावे-तेरावे घालून या सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोरोनाचे संकट नसते व सर्व काही आलबेल असते, तर सरकारने सहा महिने पूर्ण केले, या आनंदाप्रीत्यर्थ विरोधी पक्षाला श्रीखंड-पुरीचे जेवण घालता आले असते, अशी कोपरखळीही शिवसेनेने दिली आहे.
सरकारविरोधात ठणाणा बोंबा मारणे हे विरोधी पक्षाचे उद्योग आहेत. अशा बोंबा ठोकल्याने सरकारचा बालही बाका होणार नाही. विरोधी पक्षाचे सध्या 105चे बळ आहे, ते कायम राहावे, अशा आमच्या त्यांना सदिच्छा आहेत, पण सरकारचे 170 आहेत, त्याचे दोनशे झालेच तर विरोधकांनी सरकारला दोष देऊ नये, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.