मुबंई- सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर राजधानी दिल्लीत सलग तीन दिवस उफाळलेल्या हिंसाचारात तब्बल 13 जणांचा जीव गेला. अद्यापही परिस्थिती म्हणावी तशी नियंत्रणात आलेली नाही. एकीकडे अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारत दौऱ्यावर आलेले असताना, दुसरीकडे दिल्लीत हा हिंचाराचा उद्रेक झालेला होता. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे दिल्लीतील स्वागत दंगलीच्या आगडोंबाने, रस्त्यांवरील रक्ताच्या सड्याने, अक्रोश, किंकाळ्या, अश्रुधारांच्या नळकांड्यानी, दिल्लीतील भयपटाने व्हावे हे बरे नाही. ट्रम्प प्रेमाचे संदेश घेऊन दिल्लीत आले, पण त्यांच्यासमोर हे काय घडले? अहमदाबादमध्ये नमस्ते आणि दिल्लीत आगडोंब! दिल्लीची इतकी बदनामी या अगोदर कधीच झाली नाही, असे सांगत सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका केली गेली आहे.
पंतप्रधान मोदी व ट्रम्प यांच्यात चर्चा सुरू असताना शहर जळत होते. दंगली मागची कारण काहीही असो, पण देशाच्या राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्था राखायला केंद्र सरकार अपयशी ठरले असा गदरोळ उठू शकतो. 1984 मधील शीखविरोधी दंगलीचा ठपका आजही काँग्रेसवर ठेवला जातो. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शीख समुदायास लक्ष्य करण्यात आले व त्यात शेकडो शीख बांधवांचे बळी गेले. त्यास काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याची ओरड इतक्या वर्षांनंतरही भाजपाचे लोक करत आहेत. दिल्लीत हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे. लोक रस्त्यांवर काठ्या, तलवारी, बंदूक घेऊन उतरले आहेत, रक्ताचे सडे पडत आहेत. एखाद्या भयपटाचे चित्र सध्या दिल्लीत दिसत आहे. दिल्लीतील सध्याच्या दंगलीस जबाबदार कोण? हे स्पष्ट होणे गरेजेचे आहे, असे देखील सामन्यातून विचारण्यात आले आहे.
दिल्लीतील शाहीनबाग परिसरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजे सीएएविरोधात लोक अनेक दिवसांपासून रस्ता अडवून बसले आहेत. हे आंदोलन संपावे म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थ नेमले तरीही आंदोलन संपत नाही. भाजपच्या काही नेत्यांनी इशारे, धमक्यांची भाषा केली व तिथेच ठिणगी पडली असे सांगितले जाते. म्हणजे शांतपणे चाललेले हे आंदोलन भडकावे व त्याचे पर्यावसान दिल्लीत भडकलेल्या दंगलीत व्हावे अशी कुणाची इच्छा होती काय? निदान ट्रम्प परत जाईपर्यंत तरी संयम राखायला हवा होता. ट्रम्पनी त्यांच्या भाषणात पाकला दहशतवाद संपविण्याचा इशारा दिला. पाकिस्तानशी लढण्यासाठी ट्रम्प भारताला संहारक क्षेपणास्त्रे देणार आहेत, पण हा शेवटी व्यापार आहे व त्याची अब्जावधी डॉलर्सची किंमत आपल्याला चुकवावी लागेल. ट्रम्प यांनी मोदी यांचे कौतुक केले, किमान पंचवीसवेळा मोदी आणि ट्रम्प यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जे विविध करार-मदार झाले त्यात तीन अब्ज डॉलर्स किमतीची संहारक क्षेपणास्त्रे आमच्या गळ्यात मारली. अर्थात ट्रम्प यांच्या पायगुणाने देशात, महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक वाढणार असेल तर क्षेपणास्त्र व्यवहाराकडे एक व्यापारी करार म्हणून पाहायला हवे. प्रश्न पाकिस्तानविरोधात लढण्यासाठी क्षेपणास्त्रे मिळाली हा नसून मोठा फौजफाटा हाती असूनही दिल्लीची दंगल आटोक्यात येत नाही हा आहे. सीएए समर्थक आणि विरोधक समोरासमोर आल्याने दिल्लीत हिंसाचार भडकला, दोन्ही बाजूने हल्ले झाले. पोलिसांवर हल्ले झाले हे चिंताजनक असल्याचे सामन्यात म्हटले आहे.
या दंगलीचा फायदा समाजकंटक व देशविरोधी घटक घेत आहेत व ट्रम्प यांच्या दौऱ्यादरम्यान असा हिंसाचार घडावा आणि त्यातून देशाची प्रतिमा मलीन व्हावी यासाठी दंगलीचे कारस्थान रचले आहे, असे गृहमंत्रालय म्हणत आहे. पण, असे कारस्थान रचले व रटारटा शिजले हे गृहमंत्रालयास समजू नये हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
हेही वाचा -हिंसाचारादरम्यान लुटले दारूचे दुकान; दिल्लीच्या चाँद बाग परिसरातील घटना