मुंबई -पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी बालकोत्सव साजरा केला जातो. या सोहळ्याला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नाव देण्याची शिवसेनेचे नगरसेवक अरुण दुधवडकर यांची मागणी पालिका आयुक्तांनी मंजूर केली आहे.
काय होती ठरावाची सूचना -
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी गाणी, नृत्य, संगीताच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड स्तरावर पालिका स्पर्धा आयोजित करते. यामध्ये प्रत्येक शाळा, नंतर वॉर्ड आणि नंतर जिल्हा स्तरावर ही स्पर्धा होते. यानंतर अंतिम भव्य प्रदर्शन सोहळाही होतो. या ‘बालकोत्सव’ सोहळ्याला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नाव द्यावे अशी ठरावाची सूचना तत्कालीन शिवसेना नगरसेवक अरुण दुधवडकर यांनी मांडली होती. बाळासाहेबांना सिने-नाट्य कला सृष्टीतील कलावंतांबद्दल आस्था व प्रेम होते. अशा थोर व्यक्तीच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना व्हावे यासाठी बालकोत्सवाला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बालकोत्सव’ असे नामकरण करण्यात यावे असे दुधवडकर यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले होते.