मुंबई:केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी मूळ शिवसेना शिंदे गटाची असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आयोगाच्या निर्णयानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने शेण खाल्ल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. शिंदे गटावर ही त्यांनी सडकून टीका केली. मात्र, शिंदे गटाला शिवसेना पक्षाची मान्यता मिळताच, राज्यातील शाखा आणि कार्यालयांवर शिंदे गटाकडून दावा केला जातो आहे.
शाखा, कार्यालयावर दावा:बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर, सुमारे आठ वर्षानंतर शिवसेना भवन बांधण्यात आले. शिवसेनेत 'शिवसेना भवनला' विशिष्ट महत्त्व आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाकडून शिवसेना भवनवर दावा केला. मात्र, शिवसैनिकांच्या प्रखर विरोधानंतर शिंदे गटाने नमते घेतले. त्यानंतर शिवसेना भवन समोरील एका इमारतीत प्रति शिवसेना भवन उभारण्याची घोषणा केली. मागील सहा महिन्यांपासून हा वाद सुरू आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा सेनेच्या इमारती, शाखा आणि कार्यालयांवर शिंदे गटाकडून हक्क सांगितला जातो आहे. दापोली, कल्याण, ठाणे, हिंगोली आदी भागात शाखा ताब्यात घेण्यावरून राडेबाजी सुरू आहे.
शाखा ताब्यात घेण्यात मोठी अडचण:मुंबई शिवसेनेच्या २२७ शाखा आहेत आणि मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ५०० हून अधिक शाखा आहे. शिवसेनेच्या पक्ष वाढीत या शाखा ताठ कणा म्हणून उभ्या राहिल्या. शिवसेनेतील फुटीनंतर अनेक शाखांवर शिंदे गटाने कब्जा मिळवला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो शाखांतून गायब झाले. त्याऐवजी आनंद दिघे यांचे फोटो प्रत्येक कार्यालयात लागले आहेत. शिंदेंना शह देण्यासाठी मुंबईतील जुन्या शिवसैनिकांनी कंबर कसली आणि ठाकरेंच्या पाठिंब्यासाठी पुन्हा एकदा ढाल होऊन शाखा, कार्यालयात गर्दी वाढवली. त्यातील बहुतांश शाखा, इमारती आणि कार्यालये शाखाप्रमुख, स्थानिक नेते आणि ट्रस्टच्या नावाने आहेत. शाखा, कार्यालये ताब्यात घेण्यास शिंदे गटाची मोठी अडचण झाली आहे.