जळगाव - राज्यात भाजप-सेना युती तुटून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. जळगाव महापालिकेत मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप-सेना एकत्र आली आहे. भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेसह सर्वपक्षांच्या सदस्यांनी उपस्थिती देत पाठिंबा दिल्याने महापालिकेची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज (गुरुवारी) भाजपच्या नगरसेविका भारती सोनवणे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. शुक्रवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असली तरी सोनवणेंची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
जळगाव महापालिकेसाठी ऑगस्ट २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ७५ पैकी ५७ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. तर शिवसेनेला १५ आणि एमआयएमला ३ जागा मिळाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातेदेखील उघडता आले नाही. बहुमत असलेल्या भाजपने अंतर्गत बैठकीत त्यावेळी ५ वर्षापैकी सव्वा-सव्वा वर्ष भाजपच्या चार सदस्यांना महापौरपदाची संधी द्यावी, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम संधी मिळालेल्या आमदार सुरेश भोळेंच्या पत्नी सीमा भोळे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर पदासाठी नगरसेविका भारती सोनवणे यांची उमेदवारी निश्चित केली. त्यानुसार भारती सोनवणे यांनी भाजपकडून महापौरपदासाठी ४ अर्ज सादर केले. या अर्जांवर सीमा भोळे, मयूर कापसे, शुचिता हाडा, सुरेखा तायडे, भगत बालाणी, राजेंद्र पाटील, जितेंद्र मराठे, सरिता नेरकर यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्या.
हेही वाचा -'समाजात फूट पाडणाऱ्या भाजपबद्दल विचार करावाच लागेल'