मुंबई -मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या युतीच्या घोषणेचा तिढा आता सुटला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अखेर भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाल्याची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबईत पत्रक काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपुरात युती झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे. जागा वाटपाच्या संदर्भात कोणतीही घोषणा न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेने सोबत युती झाल्याची मोठी घोषणा केली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्य मित्र पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेअंती महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. भाजप, शिवसेना, रिपाईं, रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती या पक्षांच्या महायुतीची आज घोषणा करण्यात आली आहे. मात्र, महायुतीत कोणता पक्ष कोणती व किती जागा लढविणार इत्यादी तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे संयुक्त प्रसिद्ध पत्रकात सांगण्यात आले आहे. या पत्रकावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.