महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रडीच्या डावाचा पोरखेळ एक दिवस उलटणार! सामनातून भाजपवर टीकास्त्र

'जो आपल्याशी जवळीक साधत नाही. त्याच्यामागे ईडी, सीबीआय आणि इनकम टॅक्स विभाग लावायचे, असे कारस्थान भाजपचे सुरू आहे. सोनू सूदबद्दलही असेच केले आहे. सोनू दिल्ली आणि पंजाब सरकारच्या जवळ गेल्याचे दिसताच त्याच्या घरी इनकम टॅक्सने धाडी टाकल्या. भाजपचा हा रडीचा डाव आहे. तो एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही. भाजप सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. पण हे कोत्या मनाचे लक्षण आहे', असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. वाचा सविस्तर...

samana
samana

By

Published : Sep 17, 2021, 1:22 PM IST

मुंबई : अभिनेता सोनू सूदच्या कार्यालयावर आयकर विभागाच्या धाडीवर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. हा रडीचा डाव आहे. तो एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. सर्वाधिक सदस्य असलेला भाजपचे मनही मोठे असायला हवे. मात्र महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, 12 आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हा रडीचा डाव आहे. हा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

सिनेकलाकारांकडे ब्लॅक मनी

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरी, ऑफिसमध्ये आयकर विभागाने अचानक धाड टाकली. सोनू सूद किंवा एखाद्या सिनेकलाकारावर आयकर विभागाने धाड टाकणे यात आश्चर्यकारक किंवा धक्कादायक असे काहीच नाही. सिनेसृष्टीतला बराचसा व्यवहार हा रोखीत होतो. त्यास सध्याच्या भाषेत 'ब्लॅक मनी' म्हटले जाते. श्रीमान सोनू सूद याच्या अकाऊंट बुकमध्ये काहीतरी गडबड आहे, असे आयकर विभागाच्या लक्षात आले व त्यांनी धाडसत्र सुरू केले.

सोनू गरिबांचा मसीहा

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी सोनू सूद भलत्याच झोतात आला. गोरगरीबांचा मसीहा, मुंबईतून परराज्यांत जाणारे मजूर वगैरे लोकांचा आधारस्तंभ म्हणून त्याचा बोलबाला सुरू झाला. बसेस, ट्रेन्स, विमाने बुक करून सोनू मुंबईत अडकलेल्या लोकांना परराज्यांतील त्यांच्या घरी पाठवत होता.

पाणचट प्रश्न

तेव्हा ''जे सोनूला जमते ते महाविकास आघाडी सरकारला का जमत नाही?'' असले पाणचट प्रश्न विचारण्यात आले. दुसरे म्हणजे सोनू सूदला खांद्यावर घेऊन मिरवणाऱ्यात भाजप पुढे होता. सोनू सूद हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्याकडून सतत बिंबविण्यात येत होते. पण या सोनू महाशयांनी दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे 'ब्रॅण्ड ऍम्बेसेडर' म्हणून सामाजिक कार्य करायचे ठरवताच त्याच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या.

सोनू कोरोना काळात मजुरांना मदत करीत होता. सोनूने देशातील 16 शहरात

ऑक्सिजन प्लान्ट

लावले. स्कॉलरशिपची योजना सुरू केली. त्या माध्यमातून त्याचा बोलबाला झाला. या कार्यक्रमांना भाजपचे लोकही उपस्थित राहत. महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी सोनूस राजभवनावर बोलावून खास चहापान केले. तोपर्यंत सोनू हा या मंडळींना आपला, म्हणजे भाजपचा अंतरात्मा वाटत होता. सोनू महाशय जे महान समाजकार्य करत आहेत त्यामागे फक्त भाजपचीच प्रेरणा, परंपरा आहे, असे ठासून सांगितले जात होते.

सोनू दिल्ली, पंजाब सरकारशी हात मिळवताच ठरला करबुडवा

पण सोनूच्या समाजकार्याशी पंजाब, दिल्लीसारख्या सरकारांनी हात मिळविण्याचा प्रयत्न करताच सोनू सूद म्हणजे करबुडवा असे ठरविण्यात आले. आयकर विभागाने सोनूला पिळून काढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जे भाजपशी संबंधित नाहीत, अशांचा तपास यंत्रणांच्या माध्यमातून बंदोबस्त करायचा हे एक धोरण ठरले आहे. त्यातून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे मंत्री सुटले नाहीत, तसे सोनू सूदसारखे कलाकार व सामाजिक कार्य करणारेही सुटले नाहीत.

केंद्रीय तपाय यंत्रणांची भुताटकी

केंद्रीय तपास यंत्रणांच्या भुताटकीने गेल्या काही महिन्यात अनेकांना पछाडले आहे. महाराष्ट्रातील मंत्री अनिल देशमुख, अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक यांना या तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकवण्याचाच डाव आहे. भाजपचे काही चवचाल पुढारी हे स्वतःच्या बाथरूममध्ये घुसावे तसे रोज 'ईडी' कार्यालयात जाऊन मोकळे होत आहेत. हा इतका आत्मविश्वास आणि धैर्य वरच्यांच्या पाठबळाशिवाय येणे शक्यच नाही. कोणीतरी एक गुन्हेगार, बडतर्फ अधिकारी आरोप करतो, त्याच्याकडून 'आरोप' वदवून घेतले जातात व त्याबरहुकूम केंद्रीय तपास पथके भाजपविरोधकांच्या हात धुऊन मागे लागतात.

आरोपबाज सोमय्यांना आव्हान

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आता आरोपबाज सोमय्यांवर खटले दाखल करून 'बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर' अशी भूमिका घेतलीच आहे. राज्य सरकारला बदनाम करायचे, भाजपचे सरकार येनकेन प्रकारे येत नसेल तर तुमच्या सरकारलाही काम करू देणार नाही, हे दळभद्री प्रकार सूडबुद्धीने सुरूच आहेत. जे आमचे चरणदास होणार नाहीत ते आमचे दुष्मन, त्यांना भरडून टाकू, अशा विकृत लोकशाहीचा उदय होणे देशाला मारक आहे. विध्वंसक, चुकीच्या माणसांना हाती धरायचे, त्यांना आर्थिक व दिल्लीच्या सत्तेचे पाठबळ द्यायचे व महाराष्ट्रातील लोकांवर घाणेरडे आरोप करायला लावायचे.

नेत्यांच्या आरोपांची थुंकी झेलण्यासाठी तपास यंत्रणा

त्या आरोपांची थुंकी झेलण्यासाठी मग तपास यंत्रणा तयारच आहेत. राज्यांच्या अधिकारांवर गदा आणून काहीजण हे 'बलप्रयोग' करत आहेत. प. बंगालात, महाराष्ट्रात, केरळात, तामिळनाडूत या 'बलप्रयोगां'ना अपयश आले, तरी विरोधकांना चिरडणे, भरडणे थांबलेले नाही. भारतीय जनता पक्ष हा जगभरात सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. मोठ्या राजकीय पक्षाचे मनही मोठे असायला हवे. विरोधी पक्षांची राज्याराज्यातील सरकारे असतील किंवा वेगळ्या विचारांचे लोक असतील, त्या विरोधी विचारांचा आदर राखण्यातच राज्यकर्त्यांचे मोठेपण आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मागे खोटे आरोप लावणे, राज्यपालांनी वरच्या दबावामुळे 12 आमदारांची नियुक्ती रोखणे, सोनू सूदसारख्यांवर आयकर धाडी घालणे हे कोत्या मनाचे लक्षण आहे, हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाही!, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा -मोदीजी त्यांच्या वाढदिवसाला पेट्रोल-डीझेल स्वस्त करून 'बर्थडे गिफ्ट' देतील - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details