मुंबई- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विमा कंपन्यांच्याविरोधात शिवसेनेच्या वतीने आज मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक विषय घेऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आज रस्त्यावर उतरले होते. 'भारती एक्सा' या कंपनीच्या कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी 15 दिवसात कर्जमाफीचे, पीक विम्यांचे सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचा अल्टिमेटम बँकांना व पीक विमा कंपन्यांना दिला. तसेच ज्यांचे अन्न खातो त्याला जागतो, असे म्हणत शिवसेना शेतकऱयांसोबत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे -
- पीक विम्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे रस्त्यावर
- 15 दिवसात कर्जमाफीची प्रकरणे मार्गी लावा
- मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बांधील
- ज्यांचे अन्न खातोय त्याला आम्ही जागतोय
- शिवसेनेच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक - उद्धव ठाकरे
सर्व शेतकऱ्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि स्वाभिमानाला मानवंदना देण्यासाठी हा मोर्चा आहे. भारतीय सैन्यात लढणारी, शहीद होणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. बहुसंख्य जवानांचे माता-पिता हे शेतावर राबणारे आहेत. जवान निवृत्त होऊन खेड्यात जातो तेव्हा तो काळ्या आईच्या कुशीत विसावतो. आधी तो भारतमातेची सेवा करतो व शेवटी काळ्या आईची सेवा करतो. पण शेतकरी आणि जवानांच्या राष्ट्रसेवेची आपण काय कदर करतो? असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.