मुंबई:किल्ले प्रतापगडावर दरवर्षी साजरा होणारा शिवप्रताप दिन यंदा प्रथमच शासनातर्फे साजरा केला जाणार असून त्याची जय्यत तयारी सरकारकडून केली जात आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Deputy Chief Minister Devendra Fadwanis) त्याचबरोबर सातारचे पालकमंत्री शंभूराजे देसाई हे उपस्थित राहणार आहेत. यंदा पहिल्यांदाच शासनातर्फे हा दिन साजरा होणार असल्याने या दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
लेझर शो व विद्युत रोषणाई:मागील सव्वा तीनशे वर्ष हा दिन प्रतापगडावर साजरा केला जातो. २९ नोव्हेंबर आणि ३० नोव्हेंबरच्या रात्री संपूर्ण किल्ल्यावर विद्युत रोषणाई केली जाणार असून लेझर शोचही आयोजन करण्यात आले आहे. किल्ल्याची रंगरंगोटी, स्वच्छता करण्यात आली असून भगव्या पताका लावल्या जाणार आहेत. गडावरील प्रमुख टेहाळणी बुरजावर ७५ फुटी उंचीचा भगवा ध्वज फडकवण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी केली जाणार असून जिल्हा पोलिसांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर ऐतिहासिक मर्दानी खेळ, ढोल पथक, लेझीम पथकाचे कार्यक्रम होणार आहेत.